कर्म चांगली , तर नशीबही चांगलेच .....



          आज एका दिशेला माणसे वेगवेगळ्या आजाराने मरतायेत आणि दुसऱ्या दिशेला अन्नपाण्यावाचून , एका बाजूला देशात असणाऱ्या बेरोजगारी , शैक्षणिक गोष्टी मधून निर्माण झालेल्या तणावामुळे , तर दुसऱ्या बाजूला मरतायेत ती गुन्हेगारी , वाईट भावनांवर नियंत्रण न राहिल्यामुळे . आज अश्या वाईट गोष्टींमुळे समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर दुःख निर्माण होत आहे आणि जेव्हा आपण आपल्या आजूबाजूला ह्या सर्व गोष्टी बघतो ना! तेव्हा आपण नरकात तर राहत नाहीये ना! असा विचार मनात आल्यावाचून राहत नाही .
          आज मनुष्याच्या जीवनाचा खरा अर्थ कुठेतरी हरवला आहे , आज मनुष्य त्याच्या जीवनाचे शाश्वत ध्येय विसरून बसला आहे . त्यामुळे त्याचे जीवन योग्य वळण घेण्याऐवजी वाईटचं रस्त्याकडे आकर्षित होत चालले आहे आणि ही तर फक्त सुरुवात आहे , म्हणजे आपण दिखाऊ विकासाच्या , प्रगतीच्या नावाखाली ज्या वाईट , 

अंधकारमय दरीमध्ये निघालो आहे ना! त्या दरीचे , आज आपल्याला जी परिस्थिती दिसतेय ते फक्त तोंड आहे आणि हळू हळू ही दरी आपल्याला अंधकाराच्या इतक्या खोल जगामध्ये घेऊन जाईल जेथून सुटणे हे अशक्यचं आहे . 
          आज मनुष्याच्या जीवनात सुख कमी अन् दुःखचं जास्त प्रमाणात आहे . हे खरे आहे की , दुःखात घालवलेली एक रात्र , ही सुखात घालवलेल्या दिवसापेक्षा खूप मोठी भासते , पण तरीसुद्धा आज सत्य जीवनामध्ये दिवस छोटा ( सुख कमी )आणि रात्र मोठी ( दुःख जास्त ) होत चाललेली आहेचं आणि हे यापुढे वाढतचं जाणार आहे .

         कारण आपण कल्की युगात जगत आहोत . जेथे ७५ टक्के पाप ( म्हणजेच दुःख ) आणि २५ टक्के पुण्य ( म्हणजेचं सुखं ) आहे . म्हणूनच आज तुम्ही जर तुमच्या आजुबाजुला बघितलं तर तुम्हाला जाणवेल की , या जगामध्ये ७५ टक्के समाज हा गरीब आणि मध्यमवर्गीय आहे . ज्यांच्या रोजच्या जीवनात अनेक समस्या , नाही म्हंटल्या तरी आहेतचं . त्या सामाजिक असो , राजकीय असो , आर्थिक असो वा सांस्कृतिक असो आणि आता उरलेला जो २५ टक्के समाज आहे ना! हा श्रीमंत , धनवान आणि उच्च मध्यमवर्गीय लोकांचा आहे . ज्यामध्ये मोठाले व्यापारी , राज्यकर्ते आणि सकुशल व्यक्ती यांचा समावेश होतो . ज्यांचे जीवन मोठ्या प्रमाणात सुख , सुविधांनी भरलेले आहे .
          आपण नेहमी म्हणतो की , आपण कुणाचं काय वाईट केले आहे , ज्यामुळे आपल्यावरचं अशी संकटे का येतात? आणि दुसरे लोकं वाईट काम करतात , तरी देखील त्यांच्यावर संकटे येत नाही याचं कारण काय? तर याचं कारण एकचं आहे ते म्हणजे तुमचं असणारं नशीब . तुमच्या जीवनात जी सुख , दुःख , संकटे येतात ना! या सर्वांचं कारण तुमचे नशीबचं असते आणि हे तुमचे नशीब , तुमच्या कर्मावरून ठरतं असते जी की , तुम्ही तुमच्या मागच्या जन्मात म्हणा , वा त्या आधीच्या जन्मात म्हणा , केलेली असतात . त्यावर अवलंबलेले असते तुमचे ह्या जन्माचं नशीब . आज समाजामध्ये अनेक लोकं अशी आहेत जी की ,

कधी भगवंताची पूजा करत नाहीत आणि ना भगवंतासमोर ती कधी नतमस्तक होतात . काही तर उघडपणे म्हणतात की , मी भगवंताच्या अस्तित्वाला मानत नाही आणि काही , वाईट कर्मे देखील करतात तरी देखील त्या लोकांचे आयुष्य हे चांगले असते , तर काही लोकांचे सर्वांचे चांगले करून देखील आयुष्य हे वाईट असते , असं का? तर याचे उत्तर एकचं आहे , ते म्हणजे , ज्या ठिकाणी , ज्या परिस्थितीत तुम्ही आज आहात म्हणजे जी चांगली कर्मे तुम्ही आज करत आहात , त्याचं परिस्थितीत मागील कोणत्यातरी जन्मात ते लोकं होते आणि आज ज्या परिस्थितीत ते लोकं आहेत , त्या स्थितीत तुम्ही कधीतरी , कोणत्यातरी जन्मात होता . जेव्हा तुम्ही तुमच्या चांगल्या परिस्थितीचा , चांगल्या नशिबाचा वापर हा फक्त भौतिक गोष्टींचा उपभोग घेण्यासाठी केला म्हणून आज ही स्थिती तुमची आहे .
          कोणतीही गोष्टीचे फळ हे लगेचं मिळत नाही ,

" पाणी तापवण्यासाठी जरी चुलीवर ठेवले तरी ते लगेचं तापत नाही , काही क्षणांचा वा तासांचा वेळ त्यासाठी जावा लागतोचं " तसेचं आपल्या जीवनातील , आपल्या कर्माची फळे आपल्याला उपभोगायला , चाखायला मिळण्यासाठी काही काळ जावा लागतो . म्हणून जर आपल्याला आपलं नशीब चांगलं हवे असेल तर , कर्म करताना नेहमी चांगली करा म्हणजे आयुष्य सुखी समाधानी असेल .
           येणाऱ्या काळात पाप , वाईट गोष्टी ह्या वाढतचं जाणार आहे आणि त्या वाईट गोष्टींचा प्रभाव आपल्यावर पडणारचं आहे ,

" आपण एक अश्या जीवनरुपी नदीतून प्रवास करत आहोत जिचे पाणी हळूहळू खराब होत चालले आहे , ते खराब झालेले पाणी आपल्या शरीराला स्पर्श करू शकते पण त्या पाण्याचा आपल्या मनाला आणि आपल्या आत्म्याला स्पर्श करून द्यायचा की नाही , हे आपल्या हातात आहे " , म्हणून चांगले विचार घ्या , शुुद्ध विचार आणि निस्वार्थी विचार करा आणि त्याद्वारे चांगली कर्मे करा . ज्यामुळे ह्या भौतिक दुःखमय जगतातून मुक्त होण्यास , तुम्हांस आधिक सहाय्य होईल .....







         ..... वंदे मातरम ..... जय हिंद ..... जय भारत .....

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अध्यात्मिकता आणि भौतिकता यांच्यातला महत्त्वाचा फरक .....

आरक्षणाने अपूर्ण की , विनाआरक्षणानी परिपूर्ण हे आता जनतेच्या हातात

भौतिकवादी नव्हे तर आध्यात्मिकवादी विकास आधी आम्हाला हवा आहे .....