येणारा काळ ... सुवर्णकाळ .....

       

          आज मितीला भारत हे जगामध्ये एक विकसनशील राष्ट्र आहे आणि आज जी जगात परिस्थिती चाललेली आहे त्यावरून एक गोष्ट मात्र निश्चित आहे की , येणार काळ हा भारतासाठी सुवर्णकाळ असणार आहे . भारताची संस्कृती , भारताची सभ्यता , भारताची परंपरा ह्या येणाऱ्या काळात , पुन्हा जगात सर्वोच्च पातळीवर येणारं आहेत . आता हळू हळू ह्या देशात असणारे विद्वान , हे मोठ्या प्रमाणात जगापुढे येतील आणि आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर ह्या देशाला पुन्हा सर्वोच्च स्थानावर घेऊन येतील . तरी देखील इथे जो प्रश्न उद्भवतो तो आहे की , हे येणारे सामर्थ्य , अमर्याद काळ टिकवावे कसे? ते कोणत्याही क्षेत्रातले असो , सामाजिक असो , आर्थिक असो , सांस्कृतिक असो वा शैक्षणिक पण आलेली प्रबलता टिकवणे हेचं गरजेचे आहे . यश मिळवणे सोप्पे असते , पण पुढे ते टिकवणे तितकेचं अवघड . म्हणून " ध्येय हे यशाचे नव्हे , तर मिळालेले यश टिकवण्याचे असायला हवे तेव्हाचं खरी प्रगती होईल . "  
         आपल्याकडे एक म्हण प्रचलित आहे ती म्हणजे " वेळ ही प्रत्येकाची येते " आणि ती म्हणं योग्यचं आहे . कारण आज तुम्ही जगभरात बघाल तर तुमच्या लक्षात येईल की , जगातील प्रत्येक देशाची , समाजाची , धर्माची अशी वेळ आलेली आहे , ज्या वेळी ते जगात सर्वोच्च स्थानावर होते . थोडक्यात असं की ,

 जगातील सर्व देश हे एका गोल असणाऱ्या शर्यतीच्या पट्टीवर पळत आहेत आणि ह्या पट्टीवर आपल्यासोबत काळ देखील धावत आहे . हा काळ सर्वात वेगवान असतो आणि शक्तीशाली देखील , तो ज्याच्या सोबत असतो , तो देश बाकीच्या सर्वांपेक्षा सरस असतो आणि हा काळ प्रत्येकाच्या जवळ आणि सोबत येतचं असतो . जेव्हा काळ हा एखाद्याच्या जवळ येतो म्हणजेचं एखाद्या देशाच्या , तेव्हा त्या देशात प्रगतीचा सूर्य उगवायला सुरुवात होते आणि जेव्हा काळ हा त्या देशाच्या बरोबर असतो , तेव्हा त्या देशात प्रगतीची , विकासाची दुपार झालेली असते आणि जेव्हा तो अस्ताला जातो तेव्हा त्या देशाची प्रगती ही हळू हळू कमी व्हायला लागते आणि नंतर ती पूर्ण नष्ट होते

 आणि आता हा प्रगतीचा , विकासाचा सूर्य काही काळाने भारतात उगणार आहे आणि ह्या उगवत्या सुर्याबरोबर भारताकडे प्रचंड सामर्थ्य येणारं आहे . सध्या हा प्रगतीचा सूर्य पाश्चिमात्य देशांत मावळायला लागलेला आहे आणि जपान , चीन सारख्या पूर्वोत्तर देशांत तो उगवायला सुरुवात झाली आहे . आपण सध्या उषःकाळात आहोत , म्हणून आपण आत्ताचं आपल्याकडे येणाऱ्या प्रचंड सामर्थ्याला , सांभाळण्यासाठी तयार व्हायला हवं आणि त्या सामर्थ्याचा वापर करून ह्या भारत देशाच्या आणि त्याचबरोबरचं ह्या जगाचा विकासाचे आणि कल्याणाचे नियोजन करायला हवं .
          त्याचबरोबर आपण एक गोष्ट ही देखील ध्यानात ठेवायला हवी , ती म्हणजे , जेव्हा हा काळ आपल्या सोबत येईल तेव्हा , आपला वेग हा ,

आलेल्या काळाच्या बरोबरीने आपण धावू शकू आणि त्या काळाला जास्तीत जास्त वेळ आपल्या सोबत ठेऊ शकू इतका असायला हवा . ज्यामुळे येणारा आपला प्रगतीचा दिवस हा खूप मोठा असेलं . तसेच आपल्याला ह्या प्रगतीच्या दिवसात इतकी प्रचंड प्रगती आणि सामाजिक , सांस्कृतिक , आध्यात्मिक आणि आर्थिक विकास साधायचा आहे की , सूर्य अस्ताला गेल्यानंतर देखील , आपण दिवसभरातील केलेल्या प्रगतीच्या जोरावर आपल्यावर येणारी रात्र देखील देदीप्यमान करू शकू .
          त्याचं बरोबर इतर राष्ट्रांकडे स्पर्धेच्या , द्वेषाच्या भावनेने न बघता " हे विश्व ची माझे घरं " ह्या भावनेचा पुरस्कार करून ह्या जगाला सोबत घेऊन एका सुखी संसाराची निर्मिती करूया .....




  ..... वंदे मातरम ..... जय हिंद ..... जय भारत ..... 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अध्यात्मिकता आणि भौतिकता यांच्यातला महत्त्वाचा फरक .....

आरक्षणाने अपूर्ण की , विनाआरक्षणानी परिपूर्ण हे आता जनतेच्या हातात

भौतिकवादी नव्हे तर आध्यात्मिकवादी विकास आधी आम्हाला हवा आहे .....