योग्य शिक्षणातचं आहे देशाची खरी सुरक्षितता आणि प्रगती .....
काल एका १९ वर्षीय बलात्कार पीडितेची मृत्यूशी असणारी झुंज संपली आणि तिने आपल्या प्राणांचा त्याग केला आणि मग समाजातील सर्व स्तरांतून , बलात्कार करणाऱ्यांविरुद्ध रोष व्यक्त होऊ लागला त्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी त्यांना फासावर देण्यात यावे अश्या अनेक लोकांच्या भावना व्यक्त होऊ लागल्या . महिलांवर होणारे अत्याचार यांबाबत अधिक कडक कायदे , केंद्रांनी नेमायला हवे जेणेकरून अशी अमानवी कृती पुन्हा करण्याची कोणाचीही हिम्मत होणार नाही , अशीही मते अनेक जणांनी मांडली . पण हे सर्व करतं असताना आपण एक गोष्ट विसरलो , ती म्हणजे ह्या आधीही आपल्या न्यायव्यवस्थेने दिल्ली सामूहिक बलात्कारातील आरोपींना फासावर दिले , फक्त एवढेच नाही तर हैदराबाद सामूहिक बलात्कारातील आरोपींचा एनकाउंटर देखील केलेला आहे आणि एवढे करूनही देशातील बलात्कार मात्र कमी होण्याचे नाव घेत नाहीये . कालचं आलेल्या एनसीआरबीच्या अहवालानुसार देशात दररोज ८८ बलात्कार प्रकरणे समोर येतात . गेल्या वर्षी म्हणजेच २०१९ मध्ये भारत देशामध्ये बत्तीस हजार तेहतीस ( ३२०३३ ) बलात्काराच्या घटना समोर आल्या आणि हो ह्या फक्त पोलिस ठाण्यांमध्ये नोंद झालेल्याचं आहेत . तशा किती बलात्काराच्या घटना ह्या देशात आणि त्याच बरोबर जगात घडत असतील याची गणती न केलेलीच बरी .
मी माझ्या आधीच्या एका लेखामध्येही म्हटलो होतो की , ह्या बलात्काराच्या घटना कोणत्याही कायद्याने किंवा शिक्षेने थांबणाऱ्या नाहीत त्या दिवसेंदिवस वाढतचं राहणार आहे कारण फक्त कायद्यात आणि कायदा व्यवस्थेत बदल करून कोणत्याही प्रकारचा फरक ह्या राक्षसी प्रवृत्तींवर होत नाही कारण कायदा व्यवस्था ही फक्त एक प्रकारची राख आहे ,
जी फक्तं फणफणणाऱ्या चुलीतील आहरावर टाकलेली आहे पण ती त्या आहराला पूर्णपणे विझवत नाही म्हणजेच कायदा व सुव्यवस्था फक्त नावाला आहे , त्या माणसांमध्ये असणाऱ्या राक्षसी मानसिकतेला पूर्णपणे थांबूही शकत नाही आणि बदलूही शकत नाही , हा फक्त काही काळ त्या भावनेला कायद्याच्या धाकाने अडवून ठेऊ शकतात , पण जेव्हा कधीही वार्याचा छोटा का होईना पण झुरका येतो तेव्हा माणसाच्या मनातील चुलीतील आहरावरची कायद्याची राख उडते आणि मनातल्या चुलीतला भावनांचा आहरं अधिकच तप्त होतो आणि शेवटी पेट घेतो आणि ह्याच झपापणाऱ्या मिथ्याचाराच्या , संभोगाच्या आगीमध्ये अनेक स्त्रिया भस्मसात होतात .
आज फक्तं भौतिक सुखांमध्ये परावृत्त झालेल्या माणसांना थोडके आणि फक्त दिखाऊ निर्णय घेण्याची सवय लागलेली आहे . जे की आज त्या वाईट गोष्टीला होण्यापासून किंचित वाचवतील पण उद्या घडणाऱ्या अती वाईट प्रसंगाला थांबऊ शकणारं नाही . कारण जसा पाण्याचा बांध फुटला की हाहाकार माजवतो तसाच भावनांचा बांध देखील फुटला की हाहाकार माजवल्या शिवाय राहत नाही .
एक वाक्य आहे " भूतकाळातून बोध घेऊन भविष्यकाळाचा वेध घेत वर्तमानकाळात चालायचं असतं पण ह्या ठिकाणी आपल्या नेते मंडळीं आणि आपणही भूतकाळातून काहीही बोध घेतलेला नाहीये आणि नाही आपल्याला भविष्यकाळाचा कुठलाही वेध आहे . आपल्याला दिसतो आहे तो फक्त आणि फक्त वर्तमानकाळ आणि वर्तमानकाळातला आपला आपला स्वार्थ आणि ह्याचं स्वार्थापायी आपण आपली ही आणि त्याचबरोबर आपल्या देशाचीही प्रगती थांबवत आहोत .
जर आपल्याला खरंच देशात घडणाऱ्या वाईट गोष्टींवर मात करायची असेल ना! तर या दिखाऊ गोष्टी करण्यापेक्षा आपल्याला एकचं गोष्ट करायला हवी , ती म्हणजे आपल्या देशातील तरुणांना अध्यात्मिक आणि निस्वार्थी , वैचारिकपूर्ण आणि कल्पकतेने परिपूर्ण असे प्रभावी शिक्षण द्यायला हवे तेव्हाचं कुठेतरी आपल्या देशातील तरुणांमध्ये असणारी अथवा विदेशी संस्कृतीमुळे तयार होणारी भौतिक सुखांप्रतीची आणि इंद्रियवासनांप्रतीची भोगी वृत्ती कमी होईल आणि त्याद्वारे देशातील गुन्हेगारी आणि बलात्कारी प्रकरणे देखील कमी होतील .
पैशासाठी काहीही विकणाऱ्या या विदेशी लोकांच्या प्रवृत्तीमुळे आणि या विदेशी वाईटीकरणाला आधुनिकता म्हणून स्वीकारणाऱ्या आणि डोक्यावर सोन्याचा मुकुट म्हणून मिरवणाऱ्या आपल्या देशातील निर्विचार तरुणांमुळे आपल्या देशाची अक्षरशः चाळणी झालेली आहे
. आधुनिकीकरणामुळे भोग विलासाच्या गोष्टींना खूप महत्त्व प्राप्त झालेले आहेत पण त्यामुळे इंद्रिय वासना वाढली , मनावरचे नियंत्रण सुटले आणि लोकांनी अमर्याद इंद्रियउपभोग करायला सुरुवात केली आणि यातही ज्यांची भावना अधिक प्रमाणात बळावली अशा लोकांनी पुढचा मागचा कुठलाही विचार न करता क्षणिक आनंदासाठी बलात्कारासारखे नीच कृत्याला प्रत्यक्षात आणले . भगवद्गीतेतील सोळाव्या अध्यायामध्ये दैवी गुणांचे आणि राक्षसी गुणांचे उत्तम असे वर्णन करण्यात आले आहे आणि त्या अध्यायात सांगितलेले राक्षसी गुण आज अनेक लोकांमध्ये दिसतही आहेत . म्हणजेचं वाढत जाणाऱ्या भौतिक प्रगतीचा काही उपयोग नाही कारण भौतिक प्रगतीमुळे समाजात नेहमी सामाजिक असमानता
, अस्थिरता आणि अराजकताचं निर्माण होते , शांतता , पवित्रता आणि शुद्धता कधीही निर्माण होत नाही . म्हणून जर खरी आणि सर्वांगीण प्रगती करायची असेल ना! तर अध्यात्मिक शिक्षणरुपी पाण्याचा वापर आपण करायला हवा , आणि ह्या अध्यात्मिक शिक्षणरुपी पाण्याने ह्या मिथ्याचारी , संभोगी अश्या मनुष्याच्या मनातील फडफडणाऱ्या चुलीतल्या आहराचा शेवट करायला हवा! तर आणि तरचं या देशातील बलात्काराच्या , गुन्हेगारीच्या घटना कमी होतील आणि ह्या देशाची खरी प्रगती ही होईल .
एखाद्या देशाचे भविष्य हे त्या देशातील असणाऱ्या तरुणांच्या विचारावर अवलंबून असते आणि जर या तरुणांची विचार हे मद , मोह , मत्सर , लोभ , मिथ्याचार यांनी भरलेले असतील तर त्या देशाचे भवितव्य हे शून्यचं आहे . म्हणूनचं आपण अध्यात्मिक शिक्षणाद्वारे या देशातील तरुणांना निस्वार्थी , सदविचारी आणि सद्विवेकी बनवून आपल्या देशाला ह्या जगामध्ये एक विवेकवादी आणि जगाचा गुरु म्हणून ओळख प्राप्त करून द्यायला हवी .








Education is the manifestation of perfection already in men.
उत्तर द्याहटवाYa article madhe root cause var laksh kendrit keley..👍
खूप छान भावा....
उत्तर द्याहटवाSurekh article
उत्तर द्याहटवा