" भावकीचा नाही , तर गावकीचा अन देशाचा विकास करायचा आहे " .....

         


          दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या ग्रामपंचायत निवडणुका आणि त्या निवडणुकांमध्ये आलेला आपल्याला प्रचंड भाव आणि ह्या भावामध्ये वाहून गेलेली अविचारी जनता आणि ह्या जनतेला पायाशी तुडवून स्वतःचे अस्तित्व उंचावणारे काही नेते , अशी काहीतरी दयनीय अवस्था सध्या आपल्या देशाची झालेली आहे . पक्षवाद , जातीयवाद , वर्णवाद ह्या गोष्टी आपल्या देशात इतक्या प्रचंड प्रमाणात वाढत आहेत जसे की , एखाद्या विकसित जागेचे भाव . याचे कारण फक्त आपणचं आहोत , जेव्हा एखादी निवडणूक जाहीर होते , त्यावेळेला पक्षातले , काही आपल्या भावकीतले , कुटुंबातले लोक ह्या निवडणुकांसाठी उभे राहतात आणि सुरुवात होते पक्षवादाची . निवडनुका ह्या फक्त जिंकायच्या आहेत एवढेचं नेत्यांची ध्येय असतात , पण जिंकल्यानंतर काय? याचा विचार कोणीच करत नाही आणि ह्या सर्व गोष्टींमध्ये लोकांना दिलेली आश्वासने ही सारी फोल ठरतात . त्यामुळे हे त्रिवार सत्य आहे की , जगातील सर्वात कठीण काम कोणते असेल तर ते आपण दिलेल्या वचनावर ठाम असणे हे आहे . अर्थात ह्या आश्वासनांना जागण्यासाठी असणारी योग्य नीतिमत्ता ही माणसाच्या अंतरंगात दाटून भरलेली असायला लागते .


नाहीतर बऱ्याच वेळेला पाण्यात तरंगणाऱ्या एकट्या लाकडासारखी अवस्था ही मनुष्याची होते . जेव्हा जबाबदारीचे ओझे खांद्यावर येऊन पडते तेव्हा असणारी योग्य नीतिमत्ता हीदेखील बदलते म्हणजेच भ्रष्टाचार रुपी पाण्यात मनुष्याचा लाकूड रूपी शिष्टाचाराचा भाग हा बुडून जातो आणि आज असाच दिखाऊपणा प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला दिसेल . याचे कारण म्हणजे फोल , निष्फळ , तात्पुरते , फाजील , भोगी आणि गुलामी शिक्षण . ज्यामुळे आज बहुतांश मंडळी ही अपरिपक्व बनलेली आहेत आणि ह्या अशा लोकांमुळे देशाचा खरा विकास कसा होईल हा एक महत्त्वाचा प्रश्न पुढे आहे? 

          आज मी आजूबाजूला बघतोय तर बहुतांश उमेदवार हे अकार्यक्षमचं दिसतात , काही उमेदवार चांगले आहेत पण त्यांच्या पक्षातील वरिष्ठ लोक कार्यशील नाहीत . आता यामध्ये कुणालाही मतदान दिले तरी हातात येणार तरी काय? ठेंगा? जिकडे सूर्यप्रकाश असतो , तिकडे झाड वाढते हे जसे सत्य आहे तसेच इथेही कधी पैशांचा , कधी वस्तूंचा तर कधी तात्पुरत्या फाजील लालसी आश्वासनांचा प्रकाश जिकडे पडतो ,


तिकडे ही जनता झुकते आणि ह्याचं झुकणाऱ्या जनतेपायी देशात होणाऱ्या भ्रष्टाचाराला अप्रत्यक्षरीत्या चालना मिळते .
जगातील सर्वात मोठी लोकशाही ही भारताची आहे आणि जगात सर्वात जास्त निवडणुंकासाठी पैसा खर्च हा भारतातच होतो . साधी ग्रामपंचायतीची निवडणूक असली तरी एक एक उमेदवार कमीत कमी तीन ते चार लाख रुपये खर्च करतो आणि हे कुणामुळे तर इथल्या जनतेमुळे .

          आपल्या देशात राजकारण हे समाजकारण कमी आणि एक व्यवसाय अथवा धंदा जास्त बनलेला आहे . हे कशामुळे तर ह्याचं प्रचार करणाऱ्या गोष्टींमुळे . ज्याच्यामागे जेवढी लोकं फिरणार तो तितका ताकदवान म्हणून ही लोकं गोळा करण्यासाठी उमेदवार पैसे लावतो आणि लोकही विचार न करता जमा होतात आणि उमेदवारांनी दिलेल्या भेटवस्तू , लिफाफे स्वीकारतात आणि मग ही समाजकारणी राजकीय व्यवस्था एक व्यवसायिक बनून राहते . जसा शेतकरी शेतीत लावलेल्या पैशांना दुप्पट करू इच्छितो तसाच एखादा राजकारणी प्रचारासाठी लावलेले , खर्च केलेल्या पैशांना वाढवण्यासाठी भ्रष्टाचार करतो . म्हणजे इथे चुकी नक्की कोणाची तुम्हा आम्हा जनतेचीचं ना!


ज्यांना राजकारणी बिस्कीट देऊन  स्वतः मात्र पंचपक्वान सेवन करतात म्हणून आता आपण समजण्याची गरज आहे , एका दिवसाच्या मेव्यासाठी पुढील पाच वर्षे आपण खस्ता खायचा की , उमेदवाराच्या बिस्किटाला नाकारून एका चांगल्या उमेदवाराची निवड करून पुढील पाच वर्षे आपल्या गावाचा आणि त्याचबरोबर देशाचा विकास करायचा ..... 


चांगला उमेदवार म्हणजे नक्की कोण? 

१) आधीच्यांना कंटाळून नवीन चेहरा आहे म्हणून त्या उमेदवाराला मत द्यायचे आणि त्यांनेही अधिच्यांसारखे करायचे असेचं बहुतांश वेळेला आपल्या देशात होते . 

२) म्हणून जरी नवीन असला तरी त्याच्या घरची कौटुंबिक सामाजिक वागणूक कशी आहे , त्याची वैचारिकता कशी आहे , त्याने केलेल्या समाजातील सामाजिक कामे कशी आहे याचाही विचार होणे गरजेचे आहे .

३) जुना उमेदवार असेल तर साधीच गोष्ट आहे , हाती सत्ता असतानाची कामे बघा . 

४) वीज पाणी आणि एवढीचं कामे कोणत्याही राजकीय नेत्याची नसतात हे प्रथम आपण लक्षात घ्यायला हवं . 

५) महिला सबलीकरण आणि सशक्तीकरण , बालकल्याण विकास , शेतकरी विकास , मनुष्यबळ विकास आणि लोकांच्या मानसिक , वैचारिक आणि शाररिक विकास यांसारखी अनेक कामे ही राजकीय नेत्यांची असतात . 

 पण ह्या गोष्टी सामान्य जनतेला माहीत नसल्यामुळे त्याचा फायदा जनतेला घेता येत नाही , अनेक मनुष्य विकास योजनांचा लाभ हा काही राजकीय मंडळी आणि त्यांच्या परिघातील त्यांच्या जवळची माणसेचं घेतात आणि जनतेला फक्त प्राथमिक गरजा मिळवणे एवढेचं माहित असते , त्यामुळे या सर्व कामांचा विचार हा मत देताना करायलाचं हवा .

          कुणाला द्यायचं म्हणून मत देऊ नका किंवा हा माझ्या भावकीतला आहे आणि हा माझ्या पक्षाचा आहे म्हणून मतदान करू नका , तर उभा राहिलेला उमेदवार खरचं उत्तम कार्यशील वैचारिक आणि निश्चयी उमेदवार आहे का? याचाही विचार करा आणि मगचं मत द्या नाहीतर सरळ नोटा दाबा . कारण आपल्याला भावकीचा नाही तर देशाचा विकास करायचा आहे ..... 



       ..... वंदे मातरम ..... जय हिंद ..... जय भारत ..... 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अध्यात्मिकता आणि भौतिकता यांच्यातला महत्त्वाचा फरक .....

आरक्षणाने अपूर्ण की , विनाआरक्षणानी परिपूर्ण हे आता जनतेच्या हातात

भौतिकवादी नव्हे तर आध्यात्मिकवादी विकास आधी आम्हाला हवा आहे .....