स्वकीय भाषा स्वीकारा , आणि स्वतःचे अस्तित्व टिकवा .....
आता ही एक गोष्ट झाली आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या माय मराठीची . हा चित्रपट प्रदर्शित होताना हिंदीमध्ये भाषेमध्ये होतोय . माझा काही हिंदी भाषेला विरोध आहे किंवा हिंदी भाषिकांना विरोध आहे अशातला भाग नाहीये , पण महाराष्ट्रात मात्र हिंदी भाषेची गरज नाहीये आणि नाही हिंदी ही महाराष्ट्रातल्या लोकांची व्यवहाराची भाषा आहे , तर मग महाराष्ट्रात चित्रपट हिंदीत का? तो चित्रपट हिंदीत प्रदर्शित होण्याच्या ऐवजी मराठीतच व्हावा आणि व्हायला पाहिजेच , कारण आपल्या माय मराठीचा विकास व्हायला हवा , आणि मराठी महाराष्ट्रात टिकायला हवी . पण आज तसे होत नाहीये आज सगळेच हिंदी चित्रपट महाराष्ट्रात देखील हिंदीतच प्रदर्शित होत आहे .
हिंदी भाषेमध्ये चित्रपट प्रदर्शित करत आहात , चांगलेच आहे , करा प्रदर्शित , पण कुठे उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये , महाराष्ट्रमध्ये नव्हे . महाराष्ट्रात फक्त आणि फक्त मराठी मधूनच ते चित्रपट प्रदर्शित व्हायला हवेत . भारताच्या संविधानामध्ये प्रत्येक राज्यासाठी आणि त्या राज्याच्या राज्यभाषेसाठी समान स्थान आणि न्याय व हक्क देण्यात आलेले आहेत ,
आज खरोखरचं आपल्याला तामिळनाडू , आंध्रप्रदेश , कर्नाटक , केरळा या दक्षिण भारतीय राज्यांकडून शिकण्याची गरज भासू लागली आहे . कारण खरं भाषा प्रेम आणि मातृप्रेम कोणाकडे असेल ना तर ह्या दक्षिण भारतीयांकडे आहे .
मी फक्त महाराष्ट्रापुरता बोलतोय अशातला भाग नाहीये तर , भारतामध्ये जेवढी २८ राज्य आहेत , आणि त्या राज्यांत जी भाषा बोलली जाते , त्या भाषेच्या संवर्धनासाठी त्या त्या राज्यातील नागरिकांनी काम केलेच पाहिजे . कारण आपली भाषा टिकली तरच , आपण जगणार आहे आणि टिकणार आहे . " विविधतेतून एकता " अशी ओळख आपली जगात आहे , आणि म्हणूनच जर ही विविधता नष्ट झाली तर भारतही नष्ट व्हायला वेळ लागणार नाही .
म्हणून स्वतःच्या भाषेसाठी लढायला शिका कारण आज जर आपण लढलो नाही ना! तर उद्या आपल्या भाषेतील पुस्तके आणि आपली भाषा कुठल्यातरी संग्रहालयामध्ये आपल्याला पाहायला मिळेल . म्हणून विचार करा आणि आपली भाषा , आपली मराठी जोपासायला सुरुवात करा .....
..... वंदे मातरम् ..... जय हिंद ..... जय भारत .....



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा