स्वदेशीचा स्वीकार हाचं खरा देशाचा विकास .....

                               

       आज जेव्हा आपण अमेरिकेचा अभ्यास करतो तेव्हा असं लक्षात येते की , अमेरिकेचे क्षेत्रफळ हे ९८ लाख ३४ हजार चौरस किलोमीटर आहे आणि अमेरिकेची लोकसंख्या ३२ कोटी . आता भारताचा विचार करूयात , भारताची लोकसंख्या १३६ कोटी आणि क्षेत्रफळ ३२ लाख ३७ हजार चौरस किलोमीटर . याचाचं अर्थ अमेरिकेत लोकसंख्या कमी आणि जमिनीचे क्षेत्र जास्त , 


पण भारतात मात्र याउलट परिस्थिती आहे पण एवढं असूनही अमेरिका बराचं शेतीमाल हा आयातच करते आणि भारत निर्यात . ( ही स्थिती फक्त अमेरिकेबाबतची आहे , असे नसून , ही अनेक प्रगतशील देशांना देखील लागू पडते .) आता जर इथे विचार केला तर , निर्यात करणारे देश हे जास्त विकसीत असायला हवेत , पण तसे आहे का? तर नाही , आणि का नाही? याचं कारण म्हणजे आपण जी आज पिकं घेतोय , ती जरी आज आपण आपल्या भूमीत घेत असलो , तरी ती पिकवण्यासाठी , ती टिकवण्यासाठी औषधे मात्र दुसऱ्याचं देशांची वापरतोय .

भारतातील वातावरण खूप चांगल्या प्रकारचे आहे पण गेल्या काही दशकांपासून रासायनिक खतांच्या वापरामुळे इथलं सर्वकाही पालटून गेलेलं आहे . " ज्या प्रमाणे एखाद्या मनुष्याला व्यसनाची सवय लागते ना! आणि नंतर त्यांने कितीही प्रयत्न केले तरी , त्याला ती सवयं लवकर सोडवता येत नाही ." तशीचं सवय आज इथल्या मातीला या विदेशी लोकांनी लावलेली आहे . ज्याप्रमाणे एखाद्या दारू न पिणाऱ्या मित्राला , त्याचे बाकीचे मित्र मुद्दामहून सुरुवातीला बळजबरीने आणि फुकटं दारू पाजतात आणि एकदा की , त्या मित्राला दारूची म्हणा , नाहीतर कुठल्याही व्यसनाची म्हणा एकदा सवयं लागली की , नंतर त्याच्याकडून बाकीचे पैसे उकळण्यास सुरुवात करतात .

तशीच परिस्थिती आपल्या देशात , आपण ज्या देशांना मित्र समजतं‌ होतो अशा देशांनी हरित क्रांती , धवल क्रांती अशा क्रांतींच्या नावाखाली या देशात आणून , इथल्या भूमीला आणि इथल्या माणसांना या वाईट विषाची सवय लावलेली आहे . आधी आम्ही तुमच्या देशाच्या प्रगतीसाठी हातभार लावतोय , असं दाखवलं तेव्हा आमच्या सरकारनेदेखील विचार न करता ती मदत स्वीकारली आणि नंतर जेव्हा त्या विषाची सवय इथल्या भूमीला आणि माणसांना लागली तेव्हा त्याच विषाच्या विक्रीद्वारे इथल्या लोकांची पिळवणूक या विदेशी कंपनींनी आणि देशांनी चालू केली आणि आज या विषामुळे या देशातील वातावरण , जमीन हळूहळू निकृष्ट दर्जाची बनत चाललेली आहे आणि ह्या स्वदेशी जमिनीला आधार देण्यासाठी आज या विदेशी कंपन्यांची दिवसेंदिवस आधीकचं गरज इथल्या लोकांना भासू लागतं चालली आहे .  हीचं ती बाब ज्यामुळे आपल्याकडे सर्व काही असून देखील फक्त वाईट गोष्टींच्या व्यसनाधीनतेमुळे आपण दुसऱ्या देशांच्या एवढे मागे पडलेलो आहोत , त्यांचे गुलाम बनलेलो आहोत .

         अजूनही दुसरे एक कारण आहे , ते म्हणजे आपण विदेशी  देशांकडून लष्करी साहित्याची खरेदी करतो आणि कोणत्या देशांकडून , तर अशा देशांकडून जे स्वःता लवकर कोणत्याही देशासोबत युद्ध करणार नाही पण दुसऱ्या देशांना एकमेकांसोबत युद्ध करण्यासाठी मात्र परावृत्त करतील आणि त्यायोगे आपला धंदा चालवतील आणि आपल्या देशाची अर्थव्यवस्था अधिक ताकदवान बनवतील . आज आपण आपल्या देशाला बलशाली आणि सुरक्षित बनवण्यासाठी ही साहित्य खरेदी करतो , पण या साहित्यात आपला देश हा बलशाली आणि सुरक्षित होण्याच्या जागी निर्बल आणि निकृष्ट दर्जाचा होत चालला आहे .
         आज आपल्याकडे ज्ञान असूनही आपण दुसऱ्यावर विसंबलो आहोत . अरे असं म्हटलं जातं की , " जो दुसऱ्यावरी विसंबला , त्याचा कार्यभाग बुडाला " या सत्य वचनाप्रमाणे ,

आपल्यात क्षमता आहे , आपल्यात ताकद आहे पण आज आपले मनही आपल्या जमिनींसारखे , इथल्या वातावरणासारखे विदेशी गोष्टींवर , विचारांवर विसंबत चालले आहे . त्यामुळे आपला कार्यभाग हळू हळू बुडतं चालला आहे
          आज आपण , आपल्या भाषा इतक्या समृद्ध असूनही , आपल्याला आपल्या मातृभाषेंपेक्षा विदेशी भाषाचं खूप प्रिय वाटतात . इतक्या की , आज आपण त्या विदेशी भाषांना प्रगतीचे लक्षण समजून जिथे तिथे त्याचं वापरतोय . इतकी या विदेशी बाबींची सवयं आपल्याला लागलेली आहे . अरे पण खरी प्रगती ही विदेशी भाषा , विदेशी गोष्टी वापरण्यात नसून , तर आपल्या स्वतःच्या देशाच्या भाषा , परंपरा आणि संस्कृती जोपासन्यामध्ये आहे आणि त्या टिकवण्यामध्ये आहे .

आज आपल्याकडे अशी परिस्थिती झालेली आहे की , " ज्ञान आपले , शिकणारे विद्यार्थी आपले , पण शिक्षणाची भाषा मात्र विदेशी , या देशातील जमीन आपली , ही जमीन कसणारे आपण , पण पिकांसाठी लागणारी औषधे मात्र विदेशी , अरे इथे असणारे आयुष्य आपलं , हे जीवन आपलं पण ते जगण्यासाठीच्या पद्धती आणि संस्कृती मात्र विदेशी . अरे काय हे , ज्या गोष्टींची आपल्या देशाला गरज नव्हती आणि भविष्यातदेखील नसणार आहे . अशा वाईट गोष्टींची , विकासाच्या नावाखाली इथल्या लोकांना सवय लावून या विदेशी कंपन्या ह्या फक्त आणि फक्त स्वार्थीपणाचा आणि प्रगतीच्या ढोंगीपणाचा धंदा या देशात करत आहे ( आता त्यात काही आपल्या देशातील  कंपन्यादेखील सामील झालेल्या आहेत .)आणि आमचे राज्यकर्ते त्यांना तो धंदा निव्वळ स्वतःच्या स्वार्थासाठी करून देखील देत आहेत .

          १९४७ साली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले असले तरी , आज पुन्हा आपल्याला स्वातंत्र्यासाठी लढा देण्याची गरजभासू लागलेली आहे . १९४७ व त्याआधीच्या काळात आपण प्रत्यक्षपणे हल्ला करणाऱ्या शक्तींविरुद्ध लढा दिला होता आणि आज आपल्याला अप्रत्यक्षपणे आपल्या जीवनावर , आपल्या संस्कृतीवर , आपल्या विविधतेवर , आपल्या भाषेवर आणि आपल्या चारित्र्यावर हल्ला करणाऱ्या विदेशी गोष्टींविरुद्ध लढा देण्याची गरज आहे . आपल्याकडे असं म्हटले जाते की , " ज्या चांगल्या गोष्टी दुसऱ्याकडे आहेत त्यांचा स्वीकार करा , पण ज्या वाईट गोष्टी आहेत त्यांचा त्याग करा " पण आज परदेशांतून येणाऱ्या सगळ्याचं गोष्टी वाईट आहे . तरीसुद्धा आम्ही त्या गोष्टींचा स्वीकार का करत आहोत? का त्या वाईट गोष्टींना आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवत आहोत? , का?

          अरे आपला भारत देश हा जगातला सर्वात विकसित देश बनवा असे वाटतं असेल ना! तर इथल्या असणाऱ्या स्वकीय बाबींचा विकास करायला हवा . आपल्या देशातील स्वकीय शेतीपद्धती , सेंद्रिय शेतीपद्धतींचा विकास करायला हवा . आपल्या प्राचीन शिक्षणव्यवस्थेला पुन्हा जिवंत करून इथल्या तरुणांना जीवनाचा खरा अर्थ सांगायला हवा . आपल्या देशातील आयुर्वेद चिकित्सापद्धतीचा संपूर्णदेशवासीयांनी कायमचा स्वीकार करायचा हवा .
" अरे एखादा देश किती विकसित आहे हे त्या देशामध्ये किती पैसारुपी संपत्ती आहे यावर ठरत नसते , तर ते ठरत असते त्या देशातल्या संस्कृतीवर , तिथल्या लोकांच्या चांगल्या आणि सुसंस्कृत विचारांवर , तिथे असणाऱ्या लोकांच्या चारित्र्यावर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या देशात असणाऱ्या लोकांच्या मनातील देशप्रेमावर . म्हणून आपल्या देशाच्या स्वकीय गोष्टींवरच आपल्या देशाचे भवितव्य अवलंबिलेले आहे , हे आपण समजून घ्यायला हवं . " दुसऱ्याने बळजबरीने दिलेले म्हणा नाहीतर आपण स्वतः नकळत त्यांच्याकडून घेतलेले कधी ना कधी संपणारच आहे . त्यामुळे आपल्याला स्वतःला सर्व काही निर्माण करावं लागणार आहे .

म्हणून आपण आपल्या स्वदेशी भाषा-संस्कृतींचा आता स्वीकार आणि विकास करूया आणि पुन्हा एकदा या जगाचे वैश्विक गुरु बनुयातं . म्हणून उठा आणि संघर्ष करा त्या सर्व विदेशी वाईट गोष्टींविरुद्ध आणि स्वीकार व विकास करा या स्वदेशी गोष्टींचा आणि त्यायोगे या भारत देशाचा .....






         ..... वंदे मातरम ..... जय हिंद ..... जय भारत ..... 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अध्यात्मिकता आणि भौतिकता यांच्यातला महत्त्वाचा फरक .....

आरक्षणाने अपूर्ण की , विनाआरक्षणानी परिपूर्ण हे आता जनतेच्या हातात

भारतीय संस्कृती आणि व्यापाराचा विश्वसंचार .....